सुमारे ९० च्या दशकात अॅडॉब कंपनीने पीडीएफ (पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट) सर्वप्रथम शोधून काढला. आता ऑफिसच्या कामांखेरीजही कॅड ड्रॉईंग, पोर्टफोलिओ प्रेझेंटेशन्स या साऱ्यांमध्ये पीडीएफ फॉर्मॅटचा वापर केला जातो. याचे विशेष वैशिष्ठय़ म्हणजे या फॉर्मॅटमध्ये साठविलेली माहिती कोणत्याही संगणक अथवा मोबाईलवर सहजपणे वाचता येते. म्हणजेच यासाठी तो फॉन्ट आपल्याकडे असण्याची गरजही नसते. त्यामुळे इमेलद्वारे अगर कोणताही डेटा आपल्याला शेअर करायचा असेल तर पीडीएफ फॉर्मॅट अतिशय सोयीस्कर मानला जातो. ही मुख्यत: ‘रीड ओन्ली’ प्रकारातील फाईल असल्याने त्याच्या मूळ रूपात सहजासहजी बदल करता येवू शकत नाही. त्यामुळे आपला डेटा हा सुरक्षित राहू शकतो. आणखी विशेष बाब म्हणजे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असणाऱ्या फाईल्समुळे अतिशय कमी जागा व्यापली जाते.
यासाठी पीडीएफ व्हूअर सॉफ्वेअर्स उपलब्ध असतात. ती आपल्याला सहज उपलब्ध होवू शकतील . शिवाय गुगल डॉक्सचा वापर करूनही आपल्याला पीडीएफ फाईल्स पाहता येवू शकतात. पीडीएफ पाहण्यासाठी आपण गुगल क्रोमचा देखील वापर करू शकतो यावर ऑफलाईन अगर इंटरनेट कनेक्शन नसतानाही पीडीएफ फाईल्स आपल्याला पाहता येतात.
कोणत्याही वर्ड फाईलपासून पीडीएफ फाईल कशी तयार करायची..?
अॅडॉब अॅक्रॉबेट हे सॉफ्टवेअर वापरून आपण कोणतीही ऑफिस फाईल्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये रूपांतरित करू शकतो. बऱ्याचदा आपल्याकडे अॅक्रॉबेट उपलब्ध नसते परंतु इंटरनेटवर सर्च केल्यास आपल्याला ऑफिस ते पीडीएफ फाईल्स कन्व्हर्ट करणारी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध होवू शकतील. ‘पीडीएफ क्रीएटर’ किंवा ‘नायट्रो रीडर’ ही काही उत्तमोत्तम सॉफ्टवेअर्स इंटरनेटवर सहज उपलब्ध होवू शकतात. जर आपल्याला यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याइतका वेळ नसेल तर ‘गुगल डॉक्स’ आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये आपल्याला कन्व्हर्ट करावयाच्या फाईल्स गुगल डॉक्सवर अपलोड करावयाच्या आणि त्यांना पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करावयाचे यामुळे एकाचवेळी मोठय़ाप्रमाणावर फाईल्स आपल्याला कन्व्हर्ट करता येवू शकतात. याखेरीज जर आपल्याला एखादा फोटो, पॉवर पॉईन्ट प्रेझेंटेशन पीडीएफमध्ये कन्व्र्हट करावयाचे असल्यास pdf@zamzar.com या इमेल आयडीवर आपले डॉक्युमेंट अपलोड करावयाचे ते कन्व्र्हट करून आपल्याला आपल्या मेल आयडीवर पाठवितात. याखेरीजही काही सॉफ्टवेअर्स असे करू शकतात. या संकेतस्थळाचा वापर करून आपण आपल्या मोबाईलवरूनही पीडीएफ फाईल्स तयार करू शकतात. शिवाय आयफोन आणि अॅन्ड्रॉईडवर वर्ड ते पीडीएफ कन्व्हर्जन करणारी अनेक अॅप्स उपलब्ध आहेतच.
पीडीएफ फाईल्स एडिट करता येतात का? कशा?
खरंतर पीडीएफ फाईल्स ही ‘रीड ओन्ली’ डॉक्युमेंट्स असतात त्यांना वर्ड फाईल प्रमाणे एडिट करणे शक्य नसते. त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे आपल्याकडील पीडीएफ फाईल्स वर्डफॉरमॅट मध्ये बदलवायच्या आणि त्यातील हवा तो मजकूर एडिट करून पुन्हा पीडीएफ मध्ये कन्व्र्हट करायच्या. याखेरीज जर आपणास इतर फाईल्स एडिट करावयाच्या असतील तर त्यासाठी Inkscape किंवा OpenOffice Draw सारखी उत्तम सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. http://inkscape.org यावर जावून इंकस्केप आपणांस डाउनलोड करता यवू शकते व OpenOffice Draw डाउनलोड करण्यासाठी http://www.openoffice.org या संकेत स्थळास भेट द्यावी.
ऑनलाईन फॉर्म भरणे
वर सांगितल्याप्रमाणे पीडीएफ हा फॉरमॅट कोठूनही वाचता येत असल्याने ऑनलाईन फॉर्म हे पीडीएफ फॉरमॅटमध्येच उपलब्ध असतात. आपणास फॉर्म भरायचा असल्यास आपण त्या फॉर्मची प्रिंट काढतो व हाताने भरतो. परंतु अर्शी काही सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहे ज्याचा वापर करून आपण हे फॉर्म संगणकावरच सुटसुटीत व नेटकेपणाने भरून मग त्यांची प्रिंट काढू शकतो. यासाठी http://www.pdffiller.com किंवा https://www.fillanypdf.com ह्या संकेतस्थळांवर जायचे तेथे आपणास भरावयाचा फॉर्म जोडायचा व आपण तो फॉर्म सहजतेने भरू शकतो. यामध्ये त्या फॉर्मवर आवश्यक माहिती फक्त इच्छित स्थळी भरता येते. त्या फॉर्ममधील बाबीत कोणताच बदल करता येत नाही.
आपण तयार केलेल्या पीडीएफ फाईल्स सिक्युअर कशा करायच्या?
पीडीएफ फाईल्स तयार केल्यानंतर त्यांना सिक्युरीटी म्हणून पासवर्ड देता येतो. ज्यामुळे या पीडीएफ फाईल्स वेगवेगळ्या पध्दतीने सिक्युअर करता येते, उदा. मला माझ्या पीडीएफ फाईलमध्ये कोणतेच बदल केलेले नको आहेत तर मी तशा प्रकारची सिक्युरीटी त्यामध्ये अॅड करू शकतो याखेरीज कोणीही आपल्या पीडीएफ फाईल्स कॉपी अगर प्रिंट करू नये यासाठीही सिक्युरीटी अॅड करता येते. यासाठी आपण आपली सिक्युअर करावयाची पीडीएफ फाईल pdfprotect.net या ठिकाणी अपलोड करा व परत पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करा. आपल्याला आपली फाईल सिक्युअर करता येईल. याखेरीज अनेक सॉफ्टवेअर्स बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. बॅंकाच्या कामांसाठी ही सॉफटवेअर्स वापरली जातात.
कुणीतरी सिक्युअर केलेल्या फाईल्स आपल्याला पाहता येवू शकतात का?
जितक्या वाटा तितक्या पळवाटा असे म्हणतात, ते पीडीएफच्या बाबतीतही लागू होते. एखादी पीडीएफ फाईल कॉपी अगर प्रिंट करण्यापासून सुरक्षित केली असेल तर ती सिक्युरीटी आपल्याला PDFUnlock.com किंवा freemyPDF.com या ऑनलाईन सेवांची मदत होवू शकते. परंतु पासवर्ड घालून सिक्युअर केलेली फाईल परत मिळविणे जरा कठीण असते.
नोट्स काढणे..
बहुतांशी इ-बुक्स हे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असतात. जर आपल्याला या पुस्तकांतून नोट्स काढावयाच्या असतील तर आपणास हवा तो मजकूर आपण अधोरेखीत करण्याची सोय असते. जर आपल्याला एखाद्या पुस्तकातील काही पाने तशीच्या तशी कॉपी करावयाची असतील तर आपण
PDF SAM सुविधेचा वापर करून त्यातील आपणांस आवश्यक ती पाने तशीच्या तशी वेगळी काढून वेगळी पीडीएफ म्हणून साठवू शकतो.
वेबपेज ते पीडीएफ
- आपल्याकडे सध्या अनेकजण आपापले ब्लॉग चालविताना दिसतात अनेकांनी आपल्या वेबसाइट देखील उघडल्या आहेत. जर त्यावरील एखादा मजकूर आपणास आवडला व त्याची प्रिंट काढायची असल्यास तो संपूर्ण मजकूर कॉपी करून वर्ड मध्ये जाउन पेस्ट करून मग त्याची प्रिंट काढावी लागते किंवा मग आपण संपूर्ण वेबपेजच प्रिंट करतो. ज्यामध्ये अनेक अनावश्यक बाबीदेखील प्रिंट केल्या जातात. हे टाळण्यासाठी http://joliprint.com/get-the-button ह्या संकेत स्थळावर जावून दिलेल्या काही सोप्या बाबी पाळून जॉली प्रिंटचे बटन आपण आपल्या ब्लॉगवर अगर वेबसाईटवर ठेवल्यास त्यावर क्लिक् करून कोणीही वेबपेजची पीडीएफ फाईल प्रिंट करू शकतो यामुळे अनावश्यक बाबी टाळता येवू शकतात.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा